राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. अशातच डोंबिवलीत एका महिलेचा आजाराने मृत्यू झाला आहे. मृत महिला कोरोनासदृश आजार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु याबाबत सरकारने अधिकृत माहिती दिलेली नाही.
मृत महिला 11 मार्चला ऑस्ट्रेलियाहून आली होती. यानंतर 14 दिवसांनी म्हणजेच 25 मार्चपासून या महिलेला त्रास होत होता. यानंतर ही महिला उपचारासाठी एका रुग्णालयात गेली होती. तिथून त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.
मात्र रुग्णालयाने दिलेला सल्ला या महिलेने ऐकला नाही. रुग्णालयात न जाता ही महिला थेट घरी आली. परिणामी मंगळवारी रात्री या महिलेचा रात्री साडे दहा वाजता मृत्यू झाला.
मृत महिलेच्या घरी पती, बहीण आणि बहिणीचा मुलगा असून त्यांना तपासणीला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दर दिवसाला वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्याने 300चा टप्पा पार केला. तर कोरोनामुळे मृतांचा आकडादेखील 10वर गेला आहे.