जगभरामध्ये हैदोस माजवणारा कोरोना व्हायरस महाराष्ट्रमध्ये दाखल झाला आहे , राज्यात आत्तापर्यंत सतरा रुग्ण हे पॉझिटिव्ह असल्याची माहिती सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी आणि संसर्ग रोखण्यासाठी चित्रपट गृह, नाट्यगृह, शाळा, व्यायामशाळा, महाविद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन हे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याच पार्श्वभूमीवर आज ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने राज्याचे आरोग्य मंत्री मा राजेश टोपे यांची विधान भवनात भेट घेतली. सध्या चित्रपट,सिरीयलच्या क्षेत्रातही कलाकार, कर्मचारी यांना कोरोना व्हायरसची धडकी भरली आहे. चित्रपट निर्मिती कंपनीकडून आणि तेथील प्रशासनाकडून कोरोना रोगासंदर्भात कोणतीही काळजी घेतली जात नसल्याची तक्रार ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन कडून करण्यात आली.
चित्रपट, सिरियल शूटिंग ज्याठिकाणी होते तिथे किमान दीडशे ते दोनशेहून जास्त कलाकार व कर्मचारी असतात. हजारो प्रेक्षक वर्ग चित्रीकरण पाहण्यासाठी गर्दी करतात. यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी राज्यात आणि विशेषतः मुंबई मध्ये ज्या ठिकाणी चित्रपट, मालिका यांचं चित्रीकरण सुरू आहे. ती तत्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी केली आहे. त्यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री याच्याशी चर्चा करून पुढील आदेश देण्यात येतील असे आश्वासन दिलं आहे.