राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहेत. तर मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मुंबईत कोरोनाची संख्या २० हजारावर पोहचली आहे. कोरोना रुग्णांची संख्या २० हजारावर पोहचली तर लॉकडाईन लागू शकतो, असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले होते. त्यामुळे आता लॉकडाईन लागणार का? यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याबाबत मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टिकरण दिले आहे.
राज्यात कोरोना संसर्ग धोक्याची पातळी ओलांडत असल्याची कबुली किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मात्र राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाणार नसून मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार केला जात असल्याचे पेडणेकर म्हणाले. एकीकडे कोरोना संसर्ग वाढत आहे तर दुसरीकडे नागरिक बेफिकीर झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. तसेच कोरोनासह ओमायक्रॉन रुग्णांतही वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे त्यांनी सांगितले आहे.
आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील निर्बंधांबाबत योग्य निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. संध्याकाळी सात वाजेपर्यंत राज्यातील निर्बंधांबाबत निर्णय घेतला जाणार असल्यामुळे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.