संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली असून राज्य सरकारने ७ जानेवारीपर्यंत नितेश राणे यांच्यावर अटकेची कारवाई होणार नाही, अशी ग्वाही न्यायालयात देण्यात आली. त्यामुळे नितेश राणे यांना ७ जानेवारीपर्यंत दिलासा मिळाला आहे. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील पुढील सुनावणी शुक्रवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे.
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी नितेश राणेंच्या अर्जाला प्रतिज्ञापत्रावर सविस्तर उत्तर देण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंवर कारवाई होणार नसल्याची हमी सरकारी वकिलांनी दिली आहे.
संतोष परब हल्याप्रकरणी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. नितेश राणे काही दिवसांपासून अज्ञातवासात असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज सादर केलेला. या अर्जावर आज सुनावणी झाली असून त्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. तर पुढील सुनावणी शुक्रवारी ७ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता होणार आहे.