राज्याच्या निधी वाटपात इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींसोबत अन्याय होतो, अशी भूमिका काँग्रेस मंत्र्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
निधीवाटपामध्ये काँग्रेससोबत अन्याय होत असल्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचे सूर आहेत. तसेच निधीवाटपामध्ये राष्ट्रवादीला झुकतं माप दिले असल्याचेही काँग्रेसचे म्हणणे आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले. दरम्यान, काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले आहे. लोकप्रतिनिधींच्या निधी वाटपाच्या प्रक्रियेत आता स्वत: लक्ष घालणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर नाना पटोले यांनी ही माहिती दिली आहे.
राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी निधीवाटपात मात्र शिवसेनेवर अन्याय होत असल्याचा आरोप मागच्या काही काळापासून होत आहे. निधीवाटपात अर्थखाते असणारा राष्ट्रवादी काँग्रेस २ लाख ३५ हजार ३४९ कोटी रुपयांसह पहिल्या स्थानी, १ लाख ५ हजार ९८५ कोटी रुपयांसह काँग्रेस दुसऱ्या स्थानी आणि सर्वाधिक आमदारसंख्या आणि मुख्यमंत्रीपद असणारा शिवसेना पक्ष ६६ हजार २४९ कोटी रुपयांसह तिसऱ्या स्थानी अशी आकडेवारी मागील महिन्यात माध्यमांमधून प्रसिद्ध झाली होती.