मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ठाण्यातील गडकरी रंगायतनसमोर सभेसाठीची परवानगी नाकारली होती. मात्र, राज ठाकरे यांच्या ठाण्यातील सभेचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील नौपाडा परिसरातील गजानन महाराज चौकात मनसेची सभा होणार असून ठाणे पोलिसांनी राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली आहे.
सर्वात आधी राज ठाकरेंची सभा गडकरी रंगायतन समोर होणार होती. मात्र, ठाण्यात जागा आणि मैदाने कमी आहेत तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो, असे सांगत यासभेसाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरेंना सभेसाठी परवानगी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र, आता राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेचा मार्गा मोकळा झाला आहे. सभेचे स्थळ निश्चित करण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर आणि जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानुसार, ९ एप्रिल रोजी ठाण्यातील नौपाडा परिसरातील गजानन महाराज चौकात मनसेची जाहीर सभा होणार आहे. शनिवारी संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेची सभा पार पडणार आहे.
मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मनसेत मुसलमानांचे नाराजी नाट्य सुरू आहे. तर मनसेचे अनेक मुसलमान नेते पक्षाचा राजीनामा देत आहेत. त्यामुळे मनसेच्या या सभेत राज ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.