बृहन्मुंबई महानगरातील, महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही नागरिकांसाठी खुली ठेवण्याची वेळ वाढवण्याचा लोकाभिमुख निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. आता दर सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत (एकूण १५ तास) नागरिकांना उद्याने आणि मैदाने खुली राहतील. तर आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार आणि रविवारी त्याचप्रमाणे सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत (एकूण सलग १७ तास) उद्याने आणि मैदानांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
खेळाची मैदाने आणि मनोरंजन मैदाने यांचा सुयोग्य वापर व्हावा तसेच सदर उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने यांचा अधिकाधिक नागरिकांना व जास्तीत-जास्त वापर करता यावा, यासाठी उद्याने व मैदानांच्या वेळेत वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत महानगरपालिकेची उद्याने आणि मैदाने ही सकाळी ६ ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते रात्री ९ या वेळेत वापरासाठी खुली असतात. तथापि, उद्याने व मैदानांमध्ये येणाऱया अबालवृद्धांची संख्या लक्षात घेता, विशेषतः कोविड संसर्ग कालावधीनंतर सुदृढ आरोग्यासाठी जागरुक नागरिकांची वाढलेली संख्या लक्षात घेता दिवसातील जास्तीत-जास्त वेळ उद्याने व मैदाने नागरिकांना वापरासाठी खुली असावीत, असा निर्णय महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाने आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या निर्देशानुसार उद्यान विभागाने घेतला आहे, अशी माहिती उपआयुक्त (उद्याने) श्री. किशोर गांधी यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरात एकूण २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. या सर्व ठिकाणच्या वेळा वाढवल्याने सर्व मुंबईकरांना त्याचा मोठा फायदा होणार आहे, असे उद्यान अधीक्षक श्री. जितेंद्र परदेशी यांनी नमूद केले.
१) बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने ही सोमवार ते शुक्रवार पहाटे ५ ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असतील.
२) त्याचप्रमाणे शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत खुली असतील.
३) विशिष्ट उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदान खुली ठेवण्याच्या वेळेत काही बदल करावयाचा असल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त न्याय्य कारणास्तव संबंधित अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांच्या मंजुरीने बदल करु शकतील.
४) सदर परिपत्रक प्रसारित झाल्याच्या दिनांकापासून उद्यानांच्या वेळेबाबत यापूर्वी निर्गमित केलेली सर्व परिपत्रके रद्द समजण्यात येतील.
५) उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदाने नागरिकांना खुली असण्याच्या वेळेतील बदल दर्शविणारे फलक उद्यान/ मैदान/ मनोरंजन मैदाने यांच्या दर्शनी भागावर लावलेली असतील.
६) नागरिकांच्या माहितीसाठी सदर बदललेल्या वेळा या महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहेत.