माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यातील सहभागविषयी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घुमजाव केलं आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याविषयी एक जोड प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे.
ACB चे आधीचे महासंचालक संजय बर्वे यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील अजित पवार यांना दोषी धरण्यात आलं होतं.
या महत्वाच्या मुद्द्यांकडे नजरचुकीने दुर्लक्ष झाल्याचं सांगत परमबीर सिंग यांनी न्यायालयात दिलगिरी व्यक्त केली आहे.
सिंचन घोटाळ्याविषयी ACB ने विदर्भ सिंचन महामंडळाकडे अहवाल मागितला होता.
या अहवालात तत्कालीन जलसंपदा मंत्री हे विभागाच्या निर्णयासाठी जबाबदार असतात, असा अहवाल एसीबीला सादर केला होता.
बर्वे यांनी या अहवालाच्या आधारे अजित पवार या घोटाळ्याला जबाबदार असल्याचे नोव्हेंबर 2018 च्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं.
परंतु 20 डिसेंबरला परमबीर सिंग यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात हा अहवाल विचारात घेतला नव्हता असं नमूद केले होतं.
ही चूक आता एसीबीने दुरुस्त केली. बर्वे यांनी संबंधित अहवाल तपासला होता पण त्यातील माहितीचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नाही असे सिंग यांनी स्पष्ट केले आहे.