ठाकरे परिवार सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडीच्या रडारवर असल्याचे दिसत आहे. ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन कंपनीत आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्नी रश्मी ठाकरे यांचे भाऊ आहेत.
ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर कारवाई करत पुष्पक समूहाची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती जप्त केली आहे. तसेच ईडीकडून नीलांबरी प्रोजेक्टच्या ११ सदनिका जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीने २०१७मध्ये पुष्पक समुहाविरोधात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी एका कंपनीविरोधात गुन्हा नोंदवला होता. तसेच यापूर्वी पुष्पक समूहाची तब्बल २१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
ईडीने आतापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांच्या मालमत्तेवर छापेमारी करण्यात आली आहे. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. अशातच आता, ईडीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर कारवाई केल्यामुळे मुख्यमंत्र्यांना मोठा हादरा बसल्याचे सांगण्यात येत आहे.