मुंबई, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : आपली स्वप्न साकारण्यासाठी त्रिपुरातून मुंबईत आलेल्या दोन मुलांचा शोध लागला आहे. ही मुलं आगरतळा येथील एका हिंदी माध्यमाच्या शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होती. मोठं व्हायचं या उद्देशाने त्यांनी घरातून पळ काढला आणि रेल्वेमार्गे थेट मुंबई गाठली. घरातून पळाल्यानंतर पाच दिवसांनी ही मुलं मुंबईत पोहोचली. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक परिसरात ही मुलं उतरली. दोन्ही मुलं परिसर ज्या पद्धतीने न्याहाळीत होती त्यावरून पोलिसांना संशय आला आणि त्यांनी मुलांना थांबवून त्यांची चौकशी केली. मुलं घरातून पळून आल्याचे लक्षात येताच सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर पोलिसांनी त्रिपुरा पोलिसांशी संपर्क साधला आणि मुलं त्यांच्या घरी सुखरुप पोहोचावीत यासाठीचे नियोजन केले आहे.