भोपाळ, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : मध्य प्रदेश सरकारचे मंत्रालय ज्या वल्लभ भवन नावाच्या इमारतीत आहे त्या इमारतीला आग लागली आहे. वल्लभ भवनच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागली आहे, खिडक्यांमधून धुराचे लोट आकाशाच्या दिशेने जात असल्याचे लांबून दिसत आहे. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. सैन्याच्या अग्निशमन दलालाही आग विझवण्यासाठी बोलावण्यात आले आहे.
मार्च महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सुटी होती. या सुटीमुळे इमारतीत कर्मचारी नव्हते. कर्मचारी नसताना इमारत काय घडले ज्यामुळे आग लागली हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आग विझवल्यानंतर दुर्घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे संकेत मध्य प्रदेश सरकारने दिले आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, गेट क्रमांक पाच आणि सहा यांच्या दरम्यान असलेल्या मोठ्या इमारतीच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागली आहे. आग ज्या भागात लागली आहे त्याच भागात मुख्यमंत्री सचिवालयाची कागदपत्रे ठेवली जातात. याच भागात मध्य प्रदेश सरकारच्या राज्यमंत्र्यांची दालने आहेत. आग लागल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ आयएएस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री प्रशासनाच्या संपर्कात आहेत आणि वल्लभ भवन येथील ताज्या स्थितीची माहिती घेत आहेत. याआधी १२ जून २०२३ रोजी मध्य प्रदेश सरकारच्या अखत्यारित असलेल्या सातपुडा भवन नावाच्या इमारतीला आग लागली होती. ही आग दुसऱ्या दिवशी म्हणजे १३ जून २०२३ रोजी नियंत्रणात आली होती. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या वीस बंबगाड्या वापरण्यात आल्या होत्या.