मुंबई, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : लार्सन आणि टुब्रो सी ब्रिज मॅरेथॉन स्पर्धेमुळे शिवडी न्हावा शेवा अटल सेतू बंद राहणार आहे. अटल सेतूवर (एमटीएचएल) द टाइम्स ऑफ इंडिया आणि एमएमआरडीए यांच्या सहयोगाने रविवार १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ‘लार्सन आणि टुब्रो सी ब्रिज मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे अटल सेतू शिवडी-न्हावाशेवा सी-लिंकवर १७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. तसेच अटल सेतूवरून ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गावरून जाण्याच्या सूचना दिल्या आहेत.