मुंबई, ३० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये समावेश होण्यासाठी प्रत्येक देशाकडून नामांकने पाठवली जात असतात. यंदा भारताकडून युनेस्कोकडे मराठा रणभूमीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळावा यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट २०२४-२५ करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा रणभूमीला नामांकन दिलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, मुल्हेर, रांगणा, अंकाई-टंकाई, कासा, सिंधुदुर्ग, अलिबाग, सुवर्णदुर्ग आणि खांदेरी किल्ल्यांचा समावेश आहे. तसेच तामिळनाडूतील जिंजीचा किल्ल्याचा ही समावेश आहे.