मुंबई, २६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईत दादरमध्ये शिवाजी पार्क मैदानावर तिरंग्याला सलामी देण्यात आली. यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील जनतेला उद्देशून भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर राज्यपालांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती भाषणातून जनतेला दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य शासनाची भूमिका जाहीर केली.
राज्यपालांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना तसेच समाजसुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो.
महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे. माननीय पंतप्रधानांनी नुकतेच नवी मुंबई येथे देशातील सर्वात जास्त लांबीचा सागरी पूल असलेल्या ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू’चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले.
दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने ३ लाख ५३ हजार ६७५ लाख कोटींहून अधिक विक्रमी सामंजस्य करार केले आहेत.
माझ्या शासनाने बळीराजाच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले आहे. खरीप हंगाम २०२३ मध्ये प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या ४५.३५ लाख शेतकऱ्यांना २१०० कोटी रुपयांहून अधिक भरपाई अदा करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनही आपले अनुदान देत असून “नमो शेतकरी महासन्मान निधी” या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी एकूण १२०००/- रु. प्राप्त होणार आहे.
शासनाने दूध उत्पादक शेतक-यांचे आर्थिक हित जपण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलीटर पाच रुपये अनुदान जाहीर केले आहे.
पूर प्रतिबंधासाठी नद्यांमधील गाळ काढण्यात येणार आहे, ६८ जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यामुळे १३.३५ लक्ष हे सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. सुमारे ५७०० गावांत जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यात येत आहे.
माझ्या शासनाने ग्रामीण गृहनिर्माण योजना गतीमान करण्यासाठी ‘महाआवास आभियान’ सुरू केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात राज्यात ६.३१ लाख स्वयं -सहायता गट निर्माण करण्यात आले आहेत.
रोहयो अंतर्गत ३२.५० लाख मजुरांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
‘हर घर जल’ अंतर्गत जवळपास ८३.०३ टक्के कुटुंबांना घरगुती नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
राज्यातील शाळांमध्ये ‘मुख्यमंत्री – माझी शाळा सुंदर शाळा’ हे स्पर्धात्मक अभियान सुरु करण्यात आले आहे.
राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठे नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत अग्रेसर आहेत. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात ‘आई’ महिला पर्यटन धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. दीक्षाभूमी येथील विकासकामांसाठी दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
इतर मागास व विशेष मागास प्रवर्गासाठी मोदी आवास घरकुल योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. आगामी तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्यासाठी बारा हजार कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.
इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३६ जिल्ह्यांच्या ठिकाणी ७२ शासकीय वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील २५० शासकीय आदिवासी आश्रमशाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याच्या योजनेस मान्यता देण्यात आली आहे.
पात्र शिधापत्रिकाधारकांना दिवाळी, गुढीपाडवा यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिधा संच व ‘आनंदाचा शिधा’ यांचे वाटप करण्यात येणार आहे.
मुलींच्या आर्थिक सक्षमीकरणासठी ‘लेक लाडकी योजना’ सुरू करण्यात असून मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर शासनामार्फत ७५ हजार रुपये मिळणार आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावानिमित्त ७५ वर्ष पूर्ण ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास मोफत करण्यात आला आहे, तर महिलांना प्रवासात सरसकट ५० टक्के सूट देण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाबाबत मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. राज्य शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात मे २०२३ मध्ये उपचारात्मक याचिका (Curative Petition) दाखल केली. शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे.
मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याची टप्पा २ ची कार्यवाही सुरू आहे. असुरक्षित सागरी तळावर सीसीटीव्ही व नवीन बोटी खरेदी करण्याची कार्यवाही सुरु आहे.
महाराष्ट्रात ९५ हजार कोटी रुपयांची औद्योगिक गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या माध्यमातून ५५ हजार रोजगार निर्माण करण्यात येणार आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर व दिघी येथे ५ लॉजिस्टिक्स पार्क उभारण्यात येत आहे.
मुंबई कोस्टल रोडचे काम प्रगतीपथावर आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
प्रधानमंत्री आवास योजना राज्यात ४०९ शहरात लागू करण्यात आली आहे. धारावीचा एकात्मिक विकास करण्यासाठी विशेष हेतू कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
माझ्या शासनाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील क्षमतावाढ प्रकल्पाचे (मिसिंग लिंक) काम हाती घेतले आहे. ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग, विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका प्रकल्प, प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन प्रकल्पांची कामे देखील प्रगतीपथावर आहेत.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गरजू नागरिकांना १८० कोटी ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त मदत करण्यात आली आहे. सीमा भागातील गावांत मराठी भाषिकांना महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यात आले आहेत.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे धोरण माझ्या शासनाने आखले आहे.
महाराष्ट्र बांबू विकास मंडळांतर्गत बांबू क्लस्टरची निर्मिती करण्यात आली आहे.
जिल्हा व अधिनस्त न्यायालयातील न्यायिक अधिका-यांची पदे निर्माण करण्यास तसेच विशेष जलदगती न्यायालयांकरिता पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
रायगड येथे शिवराज्याभिषेक दिनाच्या ३५० व्या वर्षानिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
‘शासन आपल्या दारी’ अभियानात सुमारे दोन कोटीहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळाला.
माझे शासन सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कटिबद्ध आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत काळात नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने संकल्प करावा असे आवाहन करतो आणि सर्वांना प्रजासत्ताकदिनाच्या शुभेच्छा देतो.