मुंबई, ११ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील मालाडमधल्या मालवणी पोलिसांच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आढळले आहेत. पोलिसांनी कारवाई करून मालवणी येथील ड्रग्जची प्रयोगशाळा सील केली आहे. या प्रयोगशाळेतून पोलिसांनी १.१७ कोटी रुपयांची ड्रग्ज जप्त केली. या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
मालवणी पोलिसांनी पाच जानेवारी रोजी ३० वर्षांच्या अबरार शेख याला संशयावरून पकडले. अबरार शेखकडे एक ग्रॅम मेफेड्रोन अर्थात एमडी सापडले. या ड्रग्जला म्याव, म्याव या नावाने ओळखले जाते. पोलिसांनी अबरार शेखकडून ड्रग्ज व्यतिरिक्त शंभर बाटल्या थिनर रसायन पण जप्त केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात थिनर बघून पोलिसांनी अबरार शेखची कसून चौकशी केली आणि ड्रग्जची प्रयोगशाळा शोधून सील केली. प्रयोगशाळेत ड्रग्ज तयार करण्यासाठीची उपकरणे, वेगवेगळ्या प्रकारची रसायने आणि ड्रग्जचा साठा सापडला. पोलिसांनी ड्रग्जच्या प्रयोगशाळेतून २४ वर्षांच्या नूर चौधरी याला अटक केली. सध्या अबरार शेख आणि नूर चौधरी या दोघांची चौकशी सुरू आहे. पकडलेल्या दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.