मुंबई, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना राज्याच्या सर्वांगीण विकासात महत्वाचे क्षेत्र असणाऱ्या ऊर्जा विभागाची भूमिका मोलाची असणार आहे. त्यामुळे ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत विकासाचा सन २०३५ पर्यंतचा एकत्रित रोडमॅप पुढील तीन महिन्यांत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
महाजेनकोने सर्व अंगाने ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी अधिक वेगाने काम करणे आवश्यक आहे. कोराडी, पारस व इतर ठिकाणी ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी व्यवहार्यता तपासावी. आपल्याला निरंतर आणि गुणवत्तापूर्ण वीज कशी देता येईल याचे नियोजन आणि अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
भूमिगत वितरण प्रणाली करण्यावर भर द्यावा. प्रथम २५ टक्के भूमिगत प्रणाली करुन त्याचा अभ्यास करावा. वितरण खर्च किती वाढतो, वीज गळती किती कमी होते याचा अभ्यास करुन त्याअनुषंगाने नियोजन करावे. जादा भार असणाऱ्या वितरण वाहिन्या कमी करण्यासाठी दीर्घकालीन आणि कालबद्ध योजना आखावी. त्याचबरोबर असुरक्षित विद्युत ढाचे दूर करण्यासाठी सीएसआर निधी वापरावा,जेणेकरून यामुळे होणारे मृत्यू कमी करता येतील, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.