मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : धारावी पुनर्विकासाचे काम अदानी समूह करणार आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी उद्धव गट रस्त्यावर आला आहे. उद्धव गटाने शनिवार १६ डिसेंबर २०२३ रोजी धारावी टी जंक्शन पासून बीकेसी येथील अदानी समुहाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. मोर्चाचा शेवट पताका मैदानावर झाला. या ठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेच्या माध्यमातून उद्धव गटाने केंद्र आणि राज्य शासनावर टीका केली.
मुंबई गिळण्याचा डाव
मुंबई गिळण्याचा गुजराती लॉबीचा डाव आहे. या लॉबीला मुंबईत काय ड्रग्जचा व्यापार करायचा आहे का ? असा प्रश्न उद्धव गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. राऊत यांनी भाजपावर टीका केली.
मुंबईच्या विकासाला उद्धव यांचा विरोध
उद्धव यांनी कायम मुंबईच्या विकासाला विरोध केला आहे. आधी मेट्रोच्या कामांना विरोध नंतर धारावी पुनर्विकासाला उद्धव गटाने विरोध केला आहे, अशी टीका भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली.
धारावीकरांना धारावीतच घर हवे !
अदानी समूह धारावीचा पुनर्विकास करण्याच्या नावाखाली स्थानिकांना एका कोपऱ्यात ढकलून बीकेसी एक्सटेंशन विकसित करण्याच्या तयारीत आहे. त्यांना मोठे मॉल बांधायचे आहेत, असे काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या. धारावीकरांना धारावीतच घर मिळायला हवे, असे काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.