नवी दिल्ली, १२ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परराष्ट्रमंत्र्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालाच्या आधारे परराष्ट्रमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
भारताची भूमिका जगाने मान्य करावी, देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढावे यासाठी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर मोलाचे योगदान देत आहेत. इस्रायल – पॅलेस्टाईन प्रश्नी भारताने इस्रायलला ठाम पाठिंबा दिला आहे. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री म्हणून एस. जयशंकर यांनी अनेक देशांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला आहे. परराष्ट्र मंत्र्यांच्या कामाचा व्याप वाढत आहे. एकीकडे हा व्याप वाढत असतानाच इस्रायल विरोधकांकडून एस. जयशंकर यांच्या जिवाला धोका असल्याचे गुप्तचरांचे अहवाल आल्याचे समजते. यानंतर एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.