मुंबई, ५ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी: मुंबईतल्या दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील जलतरण तलावात मंगळवारी (३ ऑक्टोबर) मगरीचे पिल्लू आढळून आले. या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मगरीच्या पिल्लाला रेस्कू करत ताब्यात घेतलं. दरम्यान, हे पिल्लू नेमके कुठून आले, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.
शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचं पिल्लू जलतरण तलावात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. या प्राणीसंग्रालयात प्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट सुरू आहे. हे रॅकेट उध्वस्त केलं पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.
प्राणी संग्रहालय अनधिकृत आहे, हे आम्ही आधी पण सांगत होतो आणि आता ते सिद्ध झालं आहे, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. या प्राणीसंग्रहालयाच्या मालकावर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील मनसेकडून करण्यात आली आहे.