रविवार, २६ फेब्रुवारी रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी हा मेगा ब्लॉक असेल. या मध्य व हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत राहील. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.१८ या वेळेत धीम्या मार्गावरून सुटणाऱ्या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील.
पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल बंद राहतील. पनवेल येथून ठाण्याकरीता सुटणाऱ्या अप ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर सेवा उपलब्ध असेल.
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ – गोरेगाव अप- डाऊन जलद मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या ब्लॉकदरम्यान अप – डाऊन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. ब्लॉकदरम्यान काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत.