पिंपरीचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जागी त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली. तर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नगरसेवक हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. मात्र, या मतदारसंघात मुक्त टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्याऐवजी हेमंत रासने यांना संधी देण्यात आल्यामुळे कसब्यातील ब्राह्मण समाजात प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले असल्याचे बोललं जात आहे. आनंद दवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आनंद दवे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे आनंद दवे म्हणाले,” ब्राम्हणांनी भाजपच्या पडत्या काळात सर्वाधिक काम केले. भाजपची ज्यावेळी ओळखही निर्माण झाली नव्हती. अस्तित्वासाठी झटत होता त्यावेळी ब्राम्हण समाजाने सर्वाधिक काम केले. मग आता भाजपाला चांगले दिवस आल्यानंतर ब्राम्हण समाजाला का डावलण्यात येत आहे? ” असा संतप्त सवाल दवे यांनी विचारला आहे.
ते पुढे म्हणाले, “ब्राह्मण समाजाचाच उमेदवार असावा असा अट्टाहास आमचा कधीच नाही. पण लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबियांना जो न्याय लावण्यात आला तोच न्याय टिळकांच्या कुटुंबियांनाही लावायचा होता. विधानसभेत, लोकसभेत प्रत्येक जातीला प्रतिनिधित्व मिळावे, अशी हिंदू महासंघाची भूमिका आहे. तसेच कसब्यातून पोटनिवडणूक लढवणार असून मंगळवारी अर्ज भरणार असल्याचे देखील आनंद दवे म्हणाले.