जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, दोन मुलांना वाचवताना एका तरुणाने स्वतःचा जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गिरणा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या काही मुलांचा पाण्याचा अंदाज चुकल्याने ते बुडू लागले. ही परिस्थिती पाहताच जवळच असलेल्या एका तरुणाने तत्काळ धाडस दाखवत नदीत उडी घेतली आणि बचावकार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव येथील गिरणा नदीपात्रात काही मुले आंघोळीसाठी उतरली होती. मात्र नदीतील पाण्याची खोली आणि प्रवाह याचा अंदाज न आल्याने काही मुले अचानक पाण्यात गटांगळ्या खाऊ लागली. हे लक्षात येताच खान नदीम खान नावाच्या तरुणाने क्षणाचाही विलंब न करता नदीत उडी घेतली. त्याने मोठ्या धैर्याने दोन मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळवले.
तथापि, 16 वर्षीय काफिया शरीफ पिंजारी हिला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना दुर्दैवाने खान नदीम खान स्वतःही पाण्यात बुडाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपशामुळे अनेक ठिकाणी खोल खड्डे तयार झाले आहेत. यामुळेच नदीतील पाण्याची खोली अचानक वाढल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.