छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे एका 22 वर्षीय विवाहित महिलेने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. मयुरी सचिन खरे असे या तरुणीचे नाव असून ती कन्नड तालुक्यातील भोकनगाव येथील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, घरात कोणी नसताना मयुरीने राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
नातेवाईकांनी केलेल्या आरोपांनुसार, विवाहानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र नंतर हुंडा आणि दागिन्यांच्या कारणावरून तिच्याकडे वारंवार मागण्या केल्या जात होत्या. याशिवाय तिने मुलीला जन्म दिल्यानंतर ‘मुलगा का झाला नाही?’ आणि ‘मुलगीच का झाली?’ अशा कारणांवरून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या सततच्या तणावामुळे आणि कौटुंबिक वादांमुळे मयुरी मानसिकदृष्ट्या खचली होती, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अखेर या परिस्थितीला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कन्नड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून नातेवाईकांच्या तक्रारीच्या आधारे सासरच्या काही सदस्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.या घटनेमुळे महिलांवरील कौटुंबिक छळ, हुंड्याच्या मागण्या आणि मुलगा-मुलगी भेदभावाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून नेमकी परिस्थिती काय होती, याचा शोध घेतला जात आहे.