शनिवारी (दि. १ जुलै २०२३) समृद्धी महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातावरून राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. संजय राऊतांच्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
“अहो सर्वज्ञानी राऊत..अपघातावरून राजकारण करू नका. हे उद्धव ठाकरेचं घरकोंबडे सरकार नाही, शिंदे-फडणवीसांचं तत्पर सरकार आहे. घटना घडल्याबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी घटनास्थळी गेलेत.”
“प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे गिधाड तुम्ही… तुम्ही काय सांगताय, संवेदनशीलता नि असंवेदनशीलता.. पत्राचाळीत गैरव्यवहार करून मराठी माणसाला लुटताना तुमची संवेदनशीलता कोणत्या बाजारात विकली होती? कोविड कंत्राटात भ्रष्टाचार करताना संवेदनशीलता खुंटीला टांगून ठेवली होती का ? महिलेला शिवीगाळ धमक्या देतानाही कुठं गहान ठेवली होती तुमची संवेदनशीलता?”, असही त्या या ट्वीटमध्ये म्हणाल्या आहे.
दरम्यान, समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता. ट्विट करत संजय राऊत म्हणाले, “अत्यंत असंवेदनशील सरकार. देवेंद्रजी एका आईचा हा आक्रोश ऐकताय ना? राजकीय उखाळ्या पाखाळ्या कमी करा. जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्या.”