यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात भरदिवसा घडलेल्या एका शातीर चोरीच्या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील गजबजलेल्या गांधी चौक परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी एका व्यक्तीचे लक्ष विचलित करून काही क्षणांतच ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लालगुडा येथील शंकर धोटे हे काही साहित्य खरेदीसाठी वणी शहरात आले होते. त्यांनी स्टेट बँकेतून ५० हजार रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी एका पिशवीत ठेवून ती दुचाकीच्या हँडलला अडकवली होती. पैसे सुरक्षित असल्याच्या खात्रीने ते पुढील कामासाठी निघाले. मात्र, बँकेपासूनच दोन शातीर चोरटे त्यांच्यावर नजर ठेवून असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
धोटे गांधी चौक परिसरातील एका दुकानाजवळ पोहोचताच चोरट्यांनी आपली योजना अंमलात आणली. त्यांनी अचानक त्यांच्या अंगावर घाण टाकली. चालत्या गाडीवर हा प्रकार घडल्याने धोटे गोंधळले आणि त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली. अंगावरील घाण साफ करण्यात ते व्यस्त असतानाच चोरट्यांपैकी एकाने अत्यंत चतुराईने गाडीला लटकवलेली पैशांची पिशवी उचलली.
हा प्रकार इतक्या वेगाने घडला की धोटे यांना सुरुवातीला काहीच समजले नाही. काही क्षणांनी त्यांनी गाडीच्या हँडलला पाहिले असता पैशांची पिशवी गायब असल्याचे लक्षात आले. ५० हजार रुपये चोरीला गेल्याचे समजताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनीही या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त केले. विशेष म्हणजे चोरट्यांनी वापरलेली पद्धत अत्यंत नियोजनबद्ध असल्याचे बोलले जात आहे. अंगावर घाण टाकून व्यक्तीचे लक्ष दुसरीकडे वळवणे आणि त्याच क्षणी चोरी करणे, ही पद्धत यापूर्वीही काही शहरांमध्ये वापरण्यात आली असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे. फुटेजमध्ये चोरटे बँकेपासूनच पाठलाग करत असल्याचे आणि योग्य संधी साधून पैशांची पिशवी घेऊन पसार होत असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः बँकेतून मोठी रक्कम काढल्यानंतर सतर्क राहावे, अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवावे आणि गर्दीच्या ठिकाणी पैशांची बॅग उघडपणे ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.