यवतमाळमध्ये मका लागवडीतील फसवणूक; 35 शेतकऱ्यांचे 120 एकरातील पीक वाया

यवतमाळातील 35 शेतकऱ्यांची मका बियाण्याच्या फसवणुकीमुळे मोठी आर्थिक हानी; आयुषी ऍग्रोटेकवर आरोप.

यवतमाळमध्ये मका लागवडीतील फसवणूक; 35 शेतकऱ्यांचे 120 एकरातील पीक वाया

यवतमाळ: जिल्ह्यातील बाभूळगाव, नेर आणि कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांना मका लागवडीमध्ये मोठ्या फसवणुकीचा सामना करावा लागला आहे. येथील 35 शेतकऱ्यांनी हैदराबाद येथील आयुषी ऍग्रोटेक या कंपनीच्या माध्यमातून सुमारे 120 एकर क्षेत्रावर मका लागवड केली होती. मात्र, लागवडीनंतर अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. अनेक शेतांमध्ये मक्याला कणसाच आलेला नाही, तर काही ठिकाणी कणसाचे प्रमाण अत्यंत कमी आणि निकृष्ट दर्जाचे आहे.

शेतकऱ्यांनी आयुषी ऍग्रोटेक कंपनीकडून बियाणे घेतले होते. कंपनीने बियाण्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे आश्वासन दिले होते आणि लागवडीनंतर समस्या आल्यास मदत करण्याचेही वचन दिले होते. मात्र प्रत्यक्षात पिके वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कंपनीकडून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. इतकेच नाही तर कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे फोन उचलणेही बंद केले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

हेही वाचा:24 वर्षांनंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी दुर्मिळ अक्षय योग; या 4 राशींना होईल विशेष लाभ

या घटनेमुळे प्रत्येक शेतकऱ्याचे सरासरी एक लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी तर कर्ज काढून मका लागवडीसाठी भांडवल उभे केले होते. त्यामुळे आता या फसवणुकीमुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करण्यात आली होती, परंतु योग्य उत्पादन न मिळाल्याने संपूर्ण कष्ट वाया गेले आहेत.

या प्रकाराची गंभीर दखल घेत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे न्याय मागितला आहे. त्यांनी कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी तसेच आयुषी ऍग्रोटेक कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. फसवणुकीच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांचा सरकार आणि कंपन्यांवरील विश्वास डळमळीत झाल्याचे दिसून येत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number