कन्नड सुपरस्टार यश मोठ्या पडद्यावर दमदार पुनरागमन करत आहे. ‘KGF: Chapter 2’ नंतर यशचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘Toxic: A Fairy Tale for Grown-Ups’ येत्या 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. यशच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, अवघ्या काही तासांतच त्याने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
सुमारे 2 मिनिटे 31 सेकंदांचा हा टीझर अत्यंत रहस्यमय वातावरणात उलगडतो. एका स्मशानभूमीत सुरू होणाऱ्या दृश्यात चर्चमधील फादर अंत्यसंस्काराची विधी पार पाडताना दिसतो. याचवेळी एका टोळीचा तिथे प्रवेश होतो आणि वातावरण अधिकच तणावपूर्ण बनते. आपल्या मृत मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आलेला एक गँगस्टर संपूर्ण परिसर ताब्यात घेतो, आणि “तो येईल का?” असा सवाल करतो. “इतका वेडा कोणी नसतो,” असे उत्तर मिळताच नायकाच्या धडाकेबाज एंट्रीची चाहूल लागते.
क्षणात एक कार वेगाने स्मशानाच्या दिशेने येते आणि प्रवेशद्वाराजवळ झाडावर आदळते. नशेत असलेला एक माणूस अगदी विचित्र पद्धतीने बॉम्ब लावताना दिसतो. याच गोंधळात स्फोट होतो आणि तेथूनच यशच्या ‘राया’ (Raya) या व्यक्तिरेखेची धमाकेदार एंट्री होते. संपूर्ण स्मशानभूमी स्फोटांनी हादरते आणि पडद्यावर अवतरतो एक निर्दय, बेधडक गँगस्टर.
सगळा पोशाख काळ्या रंगाचा, हातात थॉम्पसन मशीनगन, तोंडात सिगारेट यशचा हा अवतार पूर्णपणे वेगळा आणि भीषण आहे. शत्रूंवर गोळ्यांचा वर्षाव करत, तलवारीने हल्ले करत त्याचा ‘लार्जर-दॅन-लाईफ’ अंदाज ठळकपणे दिसतो. टीझरच्या शेवटी “Daddy’s home” हा संवाद येताच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण होतो.
यश आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत असून, याच खास दिवशी चाहत्यांना ही सिनेमॅटिक भेट देण्यात आली आहे. टीझर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, “Get a good look at your danger, Introducing RAYA”, आणि तो मजकूरच या व्यक्तिरेखेच्या धोकादायक स्वरूपाची साक्ष देतो.
Get a good look at your danger – Introducing RAYA ?https://t.co/iUk3q6Vg3y Toxic: A Fairy Tale for Grown-Ups in cinemas worldwide on 19-03-2026#DaddyIsHome #ToxicTheMovie@TheNameIsYash#Nayanthara@humasqureshi @advani_kiara @rukminitweets #TaraSutaria #GeetuMohandas… pic.twitter.com/zT2hHGGO9b — TOXIC (@Toxic_themovie) January 8, 2026
‘Toxic: A Fairy Tale for Grown-Ups’ हा चित्रपट केवळ अॅक्शनपुरता मर्यादित न राहता, रहस्यमय कथा, सशक्त पार्श्वसंगीत आणि यशच्या प्रभावी अभिनयामुळे एक वेगळाच अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे. ‘KGF’नंतर यश पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवणार का, याकडे आता संपूर्ण सिनेसृष्टीचे लक्ष लागले आहे.