शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसैनिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडिओचे सोमवारी विधानसभेत पडसाद उमटले. आमदार मनीषा चौधरी, भारती लव्हेकर, यामिनी जाधव यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
आमदार यामिनी जाधव म्हणाल्या, “एका आमदारासोबत महिला कार्यकर्तीचा व्हिडिओ मॉर्फ करून व्हायरल केला. हा प्रकार एका आमदाराबरोबर झाला. उद्या ही वेळ तुमच्यावरही येऊ शकते. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करून कडक कारवाई करावी,” अशी मागणी केली.
आमदार मनीषा चौधरी म्हणाल्या की, “शीतल म्हात्रेंच्या व्हिडिओची चौकशी करावी. माझ्यासोबत काम करणाऱ्या आणि नगरसेविका राहिलेल्या प्रतिष्ठीत महिलेबाबत हा प्रकार घडला आहे. व्हिडिओ मॉर्फ झाला आहे. एका महिलेने माध्यमासमोर येऊन मी चुकीची नाही, असे कितीवेळा स्वतःला सिद्ध करायचे. त्यामुळे तिचे आयुष्य बरबाद होईल. ती विवाहित महिला आहे. या कृत्यामागच्या सूत्रधारावर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही याप्रकरणी आपण शीतल म्हात्रें सोबत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्या म्हणतात की, “शीतल तू लढ आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत. हा विषय फक्त शीतलपुरता मर्यादित नाही. राजकारणात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेसोबत भविष्यात या गोष्टी घडू शकतील. ना आवाहन आहे की, या हरामखोरांना सोडू नकाच, पण यांचा करविता धनी कोण आहे त्याला शोधून काढत त्याच्या आधी मुसक्या आवळा,” असे आवाहन त्यांनी केले आहे.