गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद हिचे तोकडे कपडे आणि अंगप्रदर्शनावरुन टीकेची झोड उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीकास्त्र सोडले आहे. यावेळी अंजली दमानिया यांनी राजस्थानमधील भाजपच्या जनआक्रोश सभेतील अश्लील नृत्याचा एक व्हिडिओही ट्विट केला आहे. यावर चित्रा वाघ काही बोलत का नाहीत? या बद्दल आपल्याला काय मत आहे? याला आपण कुठली संस्कृती म्हणाल? याला आपण सांस्कृतिक कार्यक्रम म्हणाल का?, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला आहे.
राजस्थानच्या अलवरमध्ये भाजपची जन आक्रोश महासभा पार पडली. या सभेत काही महिलांना नाचवण्यात आले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी स्टेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही फोटो होता. हा व्हिडिओ पाहून माझी तळपायाची आग मस्तकात केली. चित्रा वाघ भाजपमध्ये आहेत, मग त्या यावर काहीच कसे बोलत नाही. चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्या वादात मला पडायचे नाही. पण या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. चित्रा वाघ या पत्रकार परिषदेत वारंवार सांगत असतात, छत्रपतींच्या महाराष्ट्रात मी ही गोष्ट होऊन देणार नाही. मग या देशात भाजपच्या स्टेजवर अश्लील नृत्यू झालेले तुम्हाला चालते का, असा सवालही अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांना विचारला
शिवसनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही चित्रा वाघ यांच्यावर टीका केली होती. जर अल्पसंख्यांक उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला होता. उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत , केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा त्यांना मारहाणीची भाषा कराल का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला होता.