क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुदुचेरीमधील एका उदयोन्मुख महिला क्रिकेटपटूने संघात निवड न झाल्याने आत्महत्या केली आहे. एंजल गंगवाणी असे या क्रिकेटपटूचे नाव असून, ती जीएसटी अधीक्षक काश्मीर कुमार यांची मुलगी होती आणि गेल्या 12वर्षांपासून चेन्नईमध्ये राहत होती. ही 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी पुदुचेरीमध्ये प्रशिक्षण घेत होती.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एंजलचे घरमालक पी. दुराईराज यांनी सांगितले की, एंजल थिलासपेट येथील एका क्रिकेट प्रशिक्षण केंद्रात सराव करत होती आणि नुकतेच तिने थुलिपेट येथे पुदुचेरीच्या 19 वर्षांखालील टी20 संघाच्या निवड चाचण्यांमध्ये भाग घेतला होता. अंतिम यादीत स्थान न मिळाल्याने ती निराश झाली होती आणि तिने माघार घेतली होती.
अहवालात म्हटले आहे की, एंजल गेल्या काही वर्षांपासून पुदुचेरीमधील सोक्कनाथनपेट येथील एका भाड्याच्या घरात राहत होती. ती वेलारमपेट येथील एका खाजगी महाविद्यालयात बीबीएच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती.
दुराईराजने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, 29 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास क्रिकेटच्या सरावानंतर एंजल घरी परतली. नंतर त्याच रात्री, जेव्हा तिचा प्रशिक्षक, कथिरवेलने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो होऊ शकला नाही. संशय आल्याने, कथिरवेल तिच्या घरी गेला आणि त्याला एंजल छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. दुराईराज आणि प्रशिक्षकाने तिला तात्काळ कथिरकामम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.