मुंबई, २ मे २०२३, प्रतिनिधी : राजकारणातील भारदस्त व्यक्तिमत्व असणाऱ्या शरद पवार यांच्या लोक माझे सांगती भाग – २ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्याला शरद पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवृत्तीचा गौप्यस्फोट केला आहे. पवारांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माचली आहे. या संदर्भात सर्व कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली असून त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक विश्लेषकांकडून आलेल्या प्रतिक्रियांवरून एकंदरीतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवारांनंतर आता सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याचा अंदाज अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांना आता अध्यक्षपदाची नवी जबाबदारी मिळू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
यामध्ये सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या असल्याने निश्चितच पवारांचा सुप्रिया सुळेंवर आपली मुलगी म्हणून जीव असून सुप्रिया यांना राजकारणात स्थापित करण्याकडे पवारांचा कटाक्ष होता. तसेच सुप्रिया सुळे यांच्या राजकीय वाटचालीच्या सुरुवातीला राजकारणातील खाचाखोचा शिकविण्यासाठी शरद पवार यांनी त्यांच्या विश्वासू नेत्यांची नेमणूक केली होती. पवारांना सुप्रिया यांना राजकारणात नेतृत्व करण्याचं बाळकडू पवारांनी अगदी लहानपणापासून दिलं आहे. आणि पवारांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया घडत गेल्या आणि राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले. तसेच राजकीय वारस म्हणून शरद पवारांच्या मनात सुप्रियाच असल्याचे समोर येत आहे.