मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून याप्रकरणी राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. दरम्यान, दिलीप वळसे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेत बैठकीची माहिती दिली आहे.
‘राज्य सरकार भोंग्यासंदर्भात काहीही निर्णय घेऊ शकत नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत भोंगे वापरायला परवानगी आहे. रात्री १० ते सकाळी ६ याच वेळात वापरण्यावर बंदी आहे,’ अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दिली. तसेच भोंगे उतरवण्याच्या संदर्भात राज्य सरकारला कारवाई करता येत नसल्याचेही वळसे-पाटील म्हणाले.
राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, भाजपने बहिष्कार टाकत या बैठकिला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत भाजपचा कोणीही प्रतिनिधी सहभागी झाला नसून बिनाधिकारी गृहमंत्र्यांच्या बैठकीला का जायचे? असाही सवाल फडणवीसांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मविआसोबत संवाद अशक्य असून संघर्षच करावा, असे वक्तव्य फडणवीसांनी केले आहे. तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे बैठकीसाठी आपल्या पक्षाचे प्रतिनिधी पाठवले. बैठकीसाठी राज ठाकरे उपस्थित न राहता बाळा नांदगावकर यांनी प्रतिनिधित्व बजावले.
भोंग्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. मात्र, या भोंगा बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाही. त्यामुळे भोंगा बैठकीला मुख्यमंत्री का नाहीएत? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.