कसबा विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते. त्यावेळी विविध समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘आपण कोणत्याही प्रॉपर्टीवर आणि कोणत्याही मालमत्तेवर दावा करणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे वारसदार आहोत. कोणी काही बोलत असेल पण मी आत्ता स्पष्ट करतो की, आम्हाला त्यांच्या कोणत्याच प्रॉपर्टीबाबत मोह नाही’, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, ‘निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवर झालाय. त्यामुळे आता त्यावर काही बोलणे चुकीचे आहे. आम्हीच शिवसेना आहोत. त्यामुळेच आम्ही विधीमंडळातील कार्यालय ताब्यात घेतलं. पण आम्ही कोणत्याही मालमत्तेवर, प्रॉपर्टीवर दावा सांगणार नाही’, अशी आपली भूमीका त्यांनी स्पष्ट केली.
दरम्यान, शिवसेना भवनाचा शिंदे गट ताबा घेणार का? असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत होता. मात्र, आता खुद्द एकनाथ शिंदे यांनीच पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमीका स्पष्ट केली. भाजप-शिवसेनेने युती म्हणून निवडणूक लढविली. मात्र सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचारांना तिलांजली देण्यात आली. कोणी काही आरोप करत असले तरी त्यावर बोलायचे नाही. खुर्चीसाठी विचारांना तिलांजली दिल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली आहे, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरेंवर केली.