Yavatmal Crime: यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, अनैतिक संबंधांमुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पंगडी गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजेचा शॉक देऊन पतीचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप असून, सुदैवाने संबंधित व्यक्तीचा जीव बचावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन मोरे हे पंगडी गावात वास्तव्यास आहेत. त्यांनी वडगाव जंगल पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पत्नी कवडी मोरे हिचे विष्णू कडू आत्राम याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे. या संबंधात पती अडसर ठरत असल्याने दोघांनी मिळून कट रचल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, मे महिन्यातील एका रात्री गजानन मोरे हे घरात झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास पत्नीने विजेच्या वायरला अॅल्युमिनियमची तार जोडून त्यांना शॉक दिला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गजानन मोरे गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर इजा झाली असून, वेळीच शुद्धीवर आल्याने त्यांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.
घटनेनंतर जखमी गजानन मोरे यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर वडगाव जंगल पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमान्वये पत्नी कवडी मोरे आणि विष्णू आत्राम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश बैसाने आणि ठाणेदार विकास दांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली असून, वैवाहिक नात्यातील वाढत्या वादांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिस या प्रकरणातील इतर पैलूंचाही तपास करत असून, आरोपींकडून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.