शिवराज्यभिषेक दिनी मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं वादाची ठिणगी पडलीय. तर दोन दिवसांपूर्वी, अहमदनगरमध्ये उरुसनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणूकीत काही तरुणांनी औरंगजेबाचा फोटो झळकावला होता. सर्वत्र ३५० व्या शिवराज्याभिषेकाचा सोहळा अतिशय उत्साहात पार पडत असताना दुसरीकडे औरंग्याचे स्टेट्स टाकण्याचा प्रकार घडला. आणि त्यावरून चांगलाच वाद चिघळला. यावर अनेकांच्या प्रतिक्रिया उमटल्या. तर, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ‘औरंगजेबाचे फोटो दाखवला तर काय परिणाम होतो?’ असे म्हणत प्रतिक्रिया व्यक्त केली. तर यावरूनच ‘शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का?’ असा सवाल भाजपने ट्विट करत राष्ट्रवादी पक्षप्रमुख शरद पवार यांना केला आहे.
शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का?
शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? असा सवाल भाजपने ट्विट करत राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना केला आहे. तसेच एक स्क्रिनशॉट शेअरदेखील केला आहे. मतांसाठी इतके लाचार झाला की औरंग्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा तुम्ही अपमान करता. हे राज्य हा देश छत्रपती शिवाजी राजांचा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा आहे. पण शरद पवार तुम्हाला औरंग्याचा इतका पुळका का? अशा आशयाचे ट्विट भाजपने केला आहे. त्यांच्या या प्रश्नाला शरद पवार काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
काय म्हणाले होते शरद पवार?
आपल्या देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशात इतर प्रश्न उगाच समोर आणले जात आहेत. मर्यादित भागात तणाव झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाही. पण हे घडत नाही. औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात आणि कोल्हापुरात दंगल करण्याचे कारण काय? असा सवाल करतानाच फोटो दाखवला तर काय परिणाम होतो? अशा शब्दात शरद पवार यांनी फोटो झळकवणाऱ्यांचे कान टोचले. शरद पवार हे संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.