काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणी महाविकास आघाडी आणि शिंदे गट-भाजप यांच्याकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपकेले जात आहेत. दरम्यान या प्रकरणात आता स्वतंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
रणजीत सावरकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आदर आहे. पण, केवळ असे बोलून भागणार नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर केवळ नाराजी व्यक्त करुन चालणार नाही. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी राहुल गांधींशी चर्चा करावी आणि राहुल गांधींना आपल्या वक्तव्याबाबत माफी मागायला लावावी.
पुढे रणजीत सावरकर म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी व काँग्रेसला दिला आहे. मात्र, असे असूनही काँग्रेस नेत्यांचे सावरकरविरोधी वक्तव्य थांबलेले दिसत नाही. उद्धव ठाकरेंचीही काँग्रेससोबत आघाडी कायम आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच राहुल गांधींशी चर्चा करावी व त्यांना माफी मागायला लावावी.