मुंबई, ११ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने २ महिन्यांचा जामीन दिला आहे. तब्येतीचे कारण दिल्यामुळे हा जामीन देण्यात आला. हा निर्णय येताच अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही गटांच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला आहे.
तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर नवाब मलिक यांची जामिनावर सुटका होईल. पण नवाब मलिक बाहेर येण्याआधीच दादा आणि ताई गटाकडून जल्लोष करण्यात आला आहे. यामुळे नवाब मलिक नक्की कोणत्या गटात राहणार यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन्ही गटांनी नवाब मलिक हे आमच्यासोबत आहेत, असा दावा करत जल्लोष केला आहे.
नवाब मलिक बाहेर आले नसल्यामुळे ते कोणत्या गटासोबत आहेत हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. दोन्ही गट वेगवेगळे दावे करत आहेत. प्रत्यक्षात मलिक कोणत्या गटात आहेत हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.