विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेवरून खासदार संजय राऊत यांच्याकडून काही वक्तव्ये वारंवार केली जात होती. यावरुन अजित पवार यांनीही राऊतांना पलटवार केला. दरम्यान, विचारलेल्या प्रश्नावर पवार यांनी कोण संजय राऊत? असा प्रतिप्रश्न केला. पवारांनी केलेल्या या प्रतिप्रश्नावरुन त्यांची तीव्र नाराजी दिसुन येते आहे. यावरुन आघाडीत ठिणगी पडू शकते, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
अजित पवारांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी संजय राऊतांनी अजित पवारांना दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं. “तुम्ही स्पष्टीकरण दिल्यानंतरही संजय राऊत म्हणाले की अजित पवार त्यांची बाजू मांडतील, असा सल्ला त्यांनी दिलाय”, असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला. हा प्रश्न येताच, अजित पवारांनी तत्काळ, “कोण संजय राऊत?” असा प्रतिसवाल केला. “शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत” असं उत्तर पत्रकारांनी देताच, “मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, मग कोणाच्या अंगाला का लागावं?” असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं.
तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत सल्ले देत आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोण संजय राऊत, मी माझ्या पक्षाच्या संदर्भात बोललो असल्याने कोणाला लागायचे काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर भाजप दबाव टाकत आहे. तपास यंत्रणांचा वापर करून भाजप फोडाफोडीचे राजकरण करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर तुम्हाला आमचे वकीलपत्र घेण्याची काय आवश्यकता आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या पक्षात जेष्ठ प्रवक्ते आहेत. ते आमची भूमिका मांडतील, असा पलटवार अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांनी कोण संजय राऊत असे म्हणल्याने अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.