WhatsApp वापरणाऱ्यांसाठी लवकरच एक नवीन अपडेट येण्याची शक्यता आहे. या नव्या फीचरमुळे चॅट प्रायव्हसी अधिक सुरक्षित होणार असून, मेसेज वाचल्यानंतर आपोआप गायब होण्याची सुविधा मिळू शकते. सध्या डिसअपीअरिंग मेसेज फीचरमध्ये मेसेज पाठवल्यानंतर लगेच टाइमर सुरू होतो. मात्र नव्या अपडेटमध्ये रिसीव्हरने मेसेज वाचल्यानंतरच टाइमर सुरू होणार आहे.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सॲप “After Reading” नावाच्या नव्या फीचरवर काम करत आहे. हे फीचर सध्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.15.11 मध्ये पाहायला मिळाले आहे. या फीचरमुळे जर एखाद्या व्यक्तीने मेसेज उशिरा उघडला, तरी तोपर्यंत मेसेज सुरक्षित राहील. ज्या क्षणी मेसेज वाचला जाईल, त्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार तो आपोआप डिलीट होईल.
या नव्या फीचरमध्ये वापरकर्त्यांना अधिक लवचिक टाइमिंग पर्यायही मिळू शकतात. स्क्रीनशॉटनुसार, 5 मिनिटे, 1 तास आणि 12 तास असे पर्याय दिले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 5 मिनिटांचा पर्याय निवडला, तर रिसीव्हरने मेसेज वाचल्यानंतर 5 मिनिटांनी तो मेसेज आपोआप गायब होईल.
हे फीचर सध्याच्या डिसअपीअरिंग मेसेज सिस्टमसोबतच काम करेल. म्हणजेच वापरकर्त्यांकडे दोन पर्याय असतील. पहिला म्हणजे मेसेज पाठवल्यानंतर लगेच सुरू होणारा टाइमर आणि दुसरा म्हणजे मेसेज वाचल्यानंतर सुरू होणारा “After Reading” टाइमर.
विशेषतः ओटीपी, वैयक्तिक माहिती किंवा गोपनीय तपशील शेअर करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी हे फीचर खूप उपयुक्त ठरू शकते. कारण मेसेज वाचल्यानंतर काही मिनिटांतच तो डिलीट होणार असल्याने संवेदनशील माहिती जास्त वेळ चॅटमध्ये राहणार नाही.
सध्या हे फीचर विकासाच्या टप्प्यात आहे आणि सर्वसामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध नाही. सुरुवातीला ते बीटा वापरकर्त्यांसाठी जारी केले जाईल आणि त्यानंतर सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.