Shop License Suspended: ब्लिंकइट (Blinkit), झेप्टो (Zepto) आणि स्विगी इन्स्टामार्ट (Swiggy Instamart) सारख्या क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून नियमित किराणा किंवा वस्तू मागवणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या अचानक पाहणीदरम्यान महाराष्ट्रातील या तिन्ही कंपन्यांशी संबंधित एकूण 12 आउटलेट्सचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान या ठिकाणी उंदराची विष्ठा, कीटक-झुरळांचा वावर, साचलेला कचरा आणि खराब भाजीपाला आढळून आल्याने प्रशासनाने हे कडक पाऊल उचलले. अशा प्रकारची कारवाई जर भविष्यात कोणत्याही दुकानदारावर झाली किंवा परवाना निलंबित झाला, तर व्यापाऱ्यांसमोर कोणते कायदेशीर मार्ग आणि पर्याय उपलब्ध असतात, याचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे.
'कारण दाखवा' नोटीस आणि सुधारणा करण्याची संधी
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून (FSO) दुकानांची आणि गोदामांची अचानक पाहणी केली जाते. या तपासणीत अस्वच्छता, मुदत संपलेले खाद्यपदार्थ किंवा कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रथम 'कारण दाखवा' (Show-Cause) नोटीस दिली जाते. व्यापाऱ्यांनी हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की परवाना निलंबन म्हणजे दुकान कायमस्वरूपी बंद होणे नव्हे, तर ती एक तात्पुरती स्थगिती असते.
नोटीस मिळताच दिलेल्या विहित मुदतीत त्रुटींचे निवारण करून सविस्तर उत्तर प्रशासनाला सादर करणे अनिवार्य असते. दुकानाची योग्य स्वच्छता, पेस्ट कंट्रोल (Pest Control), मुदत संपलेला माल नष्ट करणे आणि नियमावलीनुसार बदल करून त्याची पुरावे-बिले सादर केल्यास FDA निलंबनाचा आदेश मागे घेऊ शकते.
हेही वाचा – Rohit Pawar: 'तुकाराम मुंढेंना ड्रग्ज विरोधी पथकाचे…'; रोहित पवारांनी फडणवीस सरकारकडे केली मोठी मागणी
अपील आणि न्यायालयीन दाद मागण्याचा अधिकार
जर दिलेल्या मुदतीत दुकानातील सर्व समस्यांचे पूर्णपणे निराकरण झाले आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे समाधान झाले, तर दुकानावरील निलंबन तातडीने उठवले जाते. मात्र, जर दुकानदाराला प्रशासनाची कारवाई अन्यायकारक, एकतर्फी किंवा नियमांना धरून वाटत नसेल, तर त्याला अन्न सुरक्षा आयुक्तांकडे (Food Safety Commissioner) अधिकृत अपील करण्याचा पूर्ण अधिकार असतो. वरिष्ठ स्तरावर किंवा अन्न सुरक्षा आयुक्तांकडूनही दिलासा मिळाला नाही, तर संबंधित व्यापारी किंवा संस्था थेट उच्च न्यायालयात (High Court) दाद मागू शकते.