पश्चिम बंगालच्या सध्याच्या मतदार यादीत तब्बल 26 लाख नावांचे रेकॉर्ड 2002 च्या मतदार यादीशी जुळत नसल्याची माहिती निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. 2002 ते 2006 या कालावधीत देशभरात पार पडलेल्या मागील Special Intensive Revision (SIR) प्रक्रियेतील नोंदींसोबत सध्याच्या यादीची तुलना करताना ही विसंगती स्पष्ट झाली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्य SIR प्रक्रियेअंतर्गत पश्चिम बंगालमधील सहा कोटींहून अधिक गणना प्रपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. ही प्रपत्रे अपलोड झाल्यानंतर ‘मॅपिंग’ प्रक्रियेत टाकली जातात, जिथे त्यांचा मागील नोंदींसोबत मेळ घातला जातो. प्राथमिक माहितीनुसार राज्यातील सुमारे 26 लाख मतदारांची नावे अजूनही मागील SIR चक्रातील डेटाशी जुळत नाहीत.
मुंबईतही मतदार नोंदीत मोठा गोंधळ मुंबईच्या मतदार यादीतही मोठी गडबड आढळली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commision, SEC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एकूण 1.03 कोटी मतदारांपैकी 10.64 टक्के म्हणजेच 11 लाखांहून अधिक मतदारांची नावे यादीत एकापेक्षा जास्त वेळा नोंदलेली आहेत. अलीकडेच प्रकाशित झालेल्या मसुदा मतदार यादीत 4.33 लाख मतदारांची नावे दोन ते 103 वेळा आढळली. परिणामी एकूण ‘डुप्लिकेट’ नोंदींचा आकडा वाढून 11,01,505 इतका झाला आहे.
विशेष म्हणजे, ज्या वार्डांमध्ये सर्वाधिक डुप्लिकेट नोंदी आढळल्या, त्या अनेक वार्डांचे प्रतिनिधित्व पूर्वी विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडे होते. SEC ने मतदार याद्यांवरील हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख वाढवून 3 डिसेंबर केली आहे, तर अंतिम मतदार यादी 10 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आयोगाने दिली.
हेही वाचा: Honkong Fire Tragedy: हॉंगकॉंगमध्ये भीषण आग; मृतांची संख्या 44 वर, शेकडो जण बेपत्ता