हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने नदी ओढे तुडूंब भरून वाहत आहेत. अशातच हवामान खात्याने 31 जुलै ते 27 ऑगस्ट या पुढील चार आठवड्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा वर्तावला आहे. पुणे घाट परिसर आणि नाशिक घाट परिसरात अत्यंत मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
यावेळी पुढील 24 ते 48 तासांत राज्याच्या काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी या काळात सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मागील आठवड्यातील सलग चार ते पाच दिवसांच्या मुसळधार पावसामुळे पालघर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात 2 हजारांहून अधिक नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले. कोकण विभागातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागात 50 ते 70 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यावेळी नाशिक शहर आणि परिसरात रेड अलर्टसोबत मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा देण्यात आला आहे. सकाळपासून नाशिक शहरात संततधार पाऊस सुरू राहणार असून गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध धरणांतून पाण्याचा विसर्ग कायम आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आलं असून गोदावरी आणि दारणा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, प्रशासनाचे आवाहन आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून सध्या 1,200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि सखल भागात जाणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धुळे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्याला आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलप्रकल्पांमधील जलसाठा वाढण्यास मदत होणार असून यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांची चिंता मिटणार आहे.
राज्यातील कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. यादरम्यान मध्य महाराष्ट्रात पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहमदनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून पुढील दोन दिवस घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर नागपूरसह आठ जिल्ह्यांना 'फ्लॅश फ्लड'चा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून सकाळी 11.30 वाजेपर्यंत अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा दिला आहे. यावेळी नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. तर नदी, नाले, ओढे आणि सखल भागांमध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भावरील अवदाबाचा प्रभाव कायम असल्याने पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता असून दुपारनंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तावला आहे. यावेळी नागरिकांनी नदी-नाल्यांपासून दूर राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासन तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.