राज्यात सध्या उष्मघातासह अवकाळीचा दुहेरी प्रहार होत आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहेत. कालपासून अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागली तर आज देखील काही भागात पावसाची शक्यता वर्तावण्यात आली आहे. तर राज्यातील काही भागांना उष्णतेचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळते आहे. सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाने आज पहाटे सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली असून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजेच्या कडकडाटसह जोरदार पाऊस कोसळला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले यासह जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाच्या सरीमुळे हवामानात गारवा जाणू लागला आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मात्र उकाड्याने त्रस्त नागरिकांना अद्याप दिलासा नाहीच. अकोला, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ तसेच अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे मराठवाड्यात मात्र पावसाने हजेरी लावली आहे. बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ठिकाणी मेघगर्जना आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात एकाच वेळी पाऊस आणि उष्णतेचा दुहेरी परिणाम जाणवत असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.