देशभरासह राज्यातील काही भागात पूर्व मोसमी पाऊस सक्रिय होत आहे. हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केलेल्या अंदाजानुसार, केरळ येथे 4 जून रोजी नैऋत्य मोसमी वारे दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे उष्णतेचा सामना करणाऱ्या नागरिकांना लवकरच काहीसा दिलासा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असताना मुंबईत देखील पावसाने हजेरी लावली आहे. तुरळक ठिकाणी वळवाच्या सरीची नोंद होत असल्याचं पहिला मिळत आहे.
मान्सून पूर्व पावसाने मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कल्याण डोंबिवली या भागात आज सकाळी एन्ट्री केली आहे. मॉन्सून लक्षव्दीप बेट, कोमोरिन, अरबी समुद्रातून वाटचाल पुढे करत असून राज्यातही आता लवकरच मॉन्सून दाखल होईल. अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपिटही झाली. यावेळी मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहत असून वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, धुळे, परभणी, मालेगाव, गोदिंया, अमरावती येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच पुणे, साताऱ्यात कमाल तापमानात घट झाली असून आज 34-36 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. विदर्भातही कमाल तापमान 38-42 अंश सेल्सिअसपर्यंत आलं असून वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे.
हवामान विभागाने येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता व्यक्त केली असतानाच मंगळवारी रात्री पनवेलमध्ये पहिल्या पावसाने मान्सूनच्या आगमनाची चाहूल दिली. उकाड्याने हैराण झालेल्या पनवेलकरांना अखेर मंगळवारी रात्री काहीसा दिलासा मिळाला. संध्याकाळनंतर अचानक आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच पावसाने बरसात सुरू केली. या पहिल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानापासून नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला. अनेक ठिकाणी नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला. केरळमध्ये येत्या दोन दिवसात मान्सून दाखल होणार असून हवामान विभागाने येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात पावसाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.