मुंबई उपनगरात आज सकाळपासून पावसाला जोर पाहायला मिळत असून आज हवामान विभागाने मुंबईला यलो अलर्ट दिला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज दिला होता. सकाळी पावसाच्या सरी बरसल्या असून आता धुक्याच वातावरण झाल आहे. यावेळी ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि कोकणात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच यवतमाळ, अमरावती, गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे विजांच्या कडकडाटासह ऑरेंज देण्यात आला आहे.
तर मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मान्सूनचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला. यावेळी महाराष्ट्रात हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 जून ते 5 जुलै दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये सर्वत्र पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह हवामान अधिक गंभीर होऊ शकते.
मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात पाऊस हा कमी जास्त प्रमाणात बरसत होता. मात्र काल संध्याकाळ पासून रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. मुख्यतः ग्रामीण भागातील छोटे नदी, नाले देखील तुडुंब भरून वाहत होते. तर काही ठिकाणी शेतात पाणी तुंबण्याचे देखील चित्र पाहायला मिळाले. संग्रामपूर तालुक्यातील केदार नदीला पूर आल्याने नदीसुद्धा तुडूंब भरून वाहू लागली.
गोंदिया जिल्ह्यात मध्यरात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यानंतरही जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, पावसामुळे शेतजमिनीत ओलावा निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून समाधानकारक पाऊस कायम राहिल्यास पेरणीची कामे अधिक गतीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.