राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असून उष्णतेपासून त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशातच अनेक भागात आजही गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला. गेले अडीच महिने अतिशय तीव्र उकाड्याने त्रासून गेलेल्या मराठवाड्यात आणि विदर्भात आज हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणासह उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमानात घट नोंदली गेली आहे.
आज मुंबईत पावसाचे चिन्ह नसून उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे, तसेच ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल येथे दमट वातावरण असून हलक्या पावसाच्या सरींची शक्यता वर्तावली आहे. यावेळी हवामान विभागाने मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी या चारही जिल्ह्यांमध्ये सकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरु असताना धुळे शहराचा जिल्ह्यात तापमानाचा पारा 45° पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात आज कमाल तापमान 37 ते 38 अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुण्यात पुढील 24 तासांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे पुण्यात मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तावली असून नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
रविवारी देखील विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली होती. अशातच आज छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला. तसेच गारपिटीचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील जवळपास सर्व शहरांच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नागपूरमध्ये सध्या सरासरीपेक्षा 2.9 अंशाची घसरण होत नागपूरचे कमाल तापमान 40.1 अंशावर खाली आले आहे, त्यामुळे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.
तर गोंदियाचे कमाल तापमान 4.8 अंशाने घसरत 39.6 वर आले असून भंडाऱ्यात तापमान 39.4 अंशावर आले आहे. तर गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, अमरावती, यवतमाळच्या तापमानातही मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. मात्र हा दिलासा केवळ एक किंवा दोन दिवसांचाच राहणार असून काही भागांमध्ये कमाल तापमानात पुन्हा 2 ते 4 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.