मुंबई : राज्यातील उन्हाची दाहकता वाढत असतानाच पाण्याची तीव्र टंचाईदेखील मोठ्या प्रमाणात असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षीच्या मान्सूनमध्ये समाधानकारक पाऊस पडला असता तरी, मागील तीन महिन्यांपासून राज्यातील नागरिक वाढत्या तापमानामुळे त्रस्त झाले आहेत. अशातच पाण्याची भीषण परिस्थिती विविध जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळत आहे. यासंबंधीत आकडेवारीसह अहवाल समोर आला असून त्यानुसार राज्यातील 15 जिल्ह्यांत पाणीटंचाईची समस्या असल्याचे दिसून येते. तसेच राज्यात 633 गावे, 1652 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला असून त्यासाठी सुमारे 706 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या भासत आहे. त्यातच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये म्हणून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या टँकर्समध्ये 33 शासकीय तर 669 खासगी टँकर्सचा समावेश आहे. साधारण 11 मे ते 17 मे 2026 दरम्यानच्या कालावधीतील अहवालानुसार ठाणे विभागात सर्वाधिक 177 गावे आणि 572 वाड्यांमध्ये 155 टँकरद्वारे पाणीपुरवठा केल्याचे दिसून येते. तर नाशिक विभागात 156 गावे आणि 444 वाड्यांसाठी 159 टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पुणे विभागात 145 गावे आणि 572 वाड्यांमध्ये 131 टँकर, छत्रपती संभाजीनगर विभागात 138 गावे आणि 64 वाड्यांसाठी एकूण 244 टँकरने पाणीपुरवठा झाला आहे. या शिवाय अमरावती विभागात 17 गावांसाठी 17 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी 2025 च्या मे महिन्यात जिल्ह्यात 120 टँकर सुरू होते. सव्वादोन लाख लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. मात्र यावर्षी ही संख्या कमी आहे. त्यासाठी गतवर्षी चांगला झालेला पाऊस, त्याबरोबर जलसंपदा विभागाने मुळा, भंडारदरा, निळवंडेसह अन्य छोट्या मोठ्या धरणातून पाण्याचे केलेले योग्य नियोजन, हे कारण समजले जात आहे. यातून गावोगावी तलाव, बंधारे भरून घेतल्याने उन्हाळ्याची दाहकता कमी झाल्याचेही दिसले.