Koyna Dam Water Release: कोयना धरण क्षेत्रातील पाण्याच्या वाढत्या आवकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून धरणातून होणाऱ्या विसर्गाचे नियोजन नव्याने करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता धरणाचे 6 वक्र दरवाजे आधीच्या 4 फुटांवरून कमी करून 3 फुटांवर आणण्यात आले.
या बदलामुळे सांडव्यावरून सध्या 18,337 क्युसेक पाणी कोयना नदीच्या पात्रात सोडले जात आहे. धरणातील पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी पाणलोट क्षेत्रातील परिस्थितीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
एकूण 19,387 क्युसेक विसर्ग; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
सांडव्याव्यतिरिक्त धरण पायथा वीजगृहातील 1 युनिटद्वारे 1,050 क्युसेक पाण्याचा पात्रात प्रवाह सुरू आहे. यामुळे सांडवा आणि वीजगृह दोन्ही मिळून एकूण 19,387 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या नदीपात्रात होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवक-जावक परिस्थितीनुसार भविष्यात या विसर्गात पुन्हा वाढ केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे कोयना नदीकाठच्या ग्रामस्थांनी, विशेषतः सखल भागातील रहिवाशांनी सुरक्षिततेची खबरदारी बाळगावी, नदीपात्रात उतरणे टाळावे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन कोयना सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.