अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मान्सूनने दमदार हजेरी लावत अक्षरशः झोडपून काढले. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मान्सूनने जवळपास अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र व्यापला आहे. उर्वरित ठिकाणी देखील पुढच्या चार दिवसांत व्यापला जाईल. सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये 50 किमी वेगानं वारे वाहणार असून या जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच बुलढाणा, गोंदिया, नांदेड, परभणी आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. तसेच मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुढच्या 48 तासांत सर्वात जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनची वाट पुन्हा संथ होण्याची शक्यता आहे.
मान्सूनची 42 टक्के कमतरता असल्यामुळे पुन्हा पावसाचा जोर कमी होऊ शकतो. 30 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रातच राहणार आहे. मान्सूनची वाट पुन्हा संथ होण्याची शक्यता आहे. यावेळी पश्चिमी प्रशांत महासागरात वादळ तयार झाल्यामुळे मान्सूनसाठी पुरक असलेलं वातावरण देखील बिघडलं आहे. यामुळे आंध्र प्रदेश, बिहार, सिंध अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या आसपास सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून पश्चिम बंगालच्या खाडीत जर कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर मान्सूनचे वारे पुढे सरकण्यासाठी मदत होते. मात्र सध्या अशी कुठलीही स्थिती तयार न झाल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सूनमुळे पुढचे 48 तास मुसळधार पाऊस होईल. त्यामुळे येत्या काळात पाच दिवस अजून मान्सूनच्या प्रवासासाठी वाट पाहावा लागणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
नुकत्याच सुरु झालेल्या पावसामुळे कुठे कुठे काय परिस्थिती?
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे कोयना धरणाच्या जलाशयात पाण्याची आवक 2377 क्युसेकने सुरु आहे. गेल्या 24 तासात जलाशयातील पाण्याच्या पातळीत सहा इंचांनी वाढ झाली आहे. तर पाणीसाठा 0.16 टीएमसीने वाढला आहे. सध्या धरणात 8.85 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.
पाऊस लांबणीवर गेल्याने जिल्ह्यात अनेक भागात पेरण्या खोळंबल्या होत्या आता मात्र काल झालेल्या दमदार पाऊसाने वाशिमच्या कारंजा तालुक्यातील विळेगाव भागात कपाशी लागवडीला सुरुवात झाली असून पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्याने आता पेरणीला सुरुवात केली आहे,उशिरा का होईना पेरणी योग्य पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
धुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावण्या सुरुवात केल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असताना शेतीची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती. अखेर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिल्या असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांची पेरणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पहिल्याच पावसात अकोला जिल्ह्याचं चित्र बदललं आहे. ओढे, नाले, शेतात पाणी, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अकोला जिल्ह्यात मागील 24 तासात झालेल्या पावसामुळे कोरड्या पडलेल्या नद्या आता दुथडी भरून वाहताना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात झालेल्या पावसामुळे या पर्वतरांगातील नदी ओढे दुथळी भरून वाहतानाचे चित्र दिसत आहे.
जळगावच्या रावेरच्या खिरवड येथिल नदिला पूर आला असून दमदार पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचले आहे. तसेच विदर्भात मान्सून दाखल झाला असल्याने अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे.