Wardha Crime: 12 वर्षांच्या चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, आरोपी राहुल मडावी गजाआड; वर्ध्यात नेमकं काय घडलं?

वर्धा जिल्ह्यातील रोठा गावात १२ वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. लैंगिक अत्याचाराचा संशय असून सावंगी पोलिसांनी आरोपी राहुल मडावीला अटक केली आहे

Wardha Crime: 12 वर्षांच्या चिमुरडीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, आरोपी राहुल मडावी गजाआड; वर्ध्यात नेमकं काय घडलं?

वर्धा:: वर्धा जिल्ह्यातील रोठा गावामध्ये मन सुन्न करणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षांच्या निष्पाप चिमुरडीची दगडाने डोके ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या दुर्दैवी मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा तीव्र संशय व्यक्त केला जात असून, या धक्कादायक प्रकरणातील संशयित आरोपी राहुल राजू मडावी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मृत बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सावंगी पोलीस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडली नेमकी घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित चिमुरडी नेहमीप्रमाणे बुधवारी (१५ जुलै) दुपारी ३ वाजताच्या सुमारास शाळेतून आनंदात घरी परतली होती. तिचे कुटुंब अत्यंत गरीब असून शेतात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करते. घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे चिमुरडीची आई आणि मोठी बहीण शेतात कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जेव्हा माय-लेकी दिवसभराचे काम संपवून घरी परतल्या, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतातील घरात त्यांना चिमुरडीचा विवस्त्र आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आला. एका निष्पाप जीवाचा असा अत्यंत क्रूर अंत पाहून संपूर्ण कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला.

दगडाने ठेचून हत्या, लैंगिक अत्याचाराचा संशय

घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासानुसार, नराधमाने चिमुरडीची अत्यंत निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या केली होती. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला रक्ताने माखलेला दगड जप्त केला आहे. मृतदेहाची अवस्था पाहता, हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाल्याचा दाट संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानुसार गुन्ह्यात संबंधित गंभीर कलमे जोडण्यात आली आहेत. मात्र, अत्याचाराबाबतचा अंतिम निष्कर्ष हा वैद्यकीय तपासणी आणि न्यायवैद्यकीय (फॉरेन्सिक) अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी अटकेत, संपूर्ण गाव सुन्न

या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य संशयित राहुल राजू मडावी याला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून या अमानुष कृत्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता, याचा शोध पोलीस घेत आहेत.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number